इस्राएलांशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात आणखी एक पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो हा पवित्र करार होय.
मोशेन सर्व इस्राएलांना जवळ बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मिसरमध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे.
तुम्हीं भाकरी खाल्ली नाही की द्राक्षारस अथवा मद्य प्यायले नाही. पण परमेश्वराने तुमची काळजी वाहिली. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हांला कळावे म्हणून त्याने असे केले.
त्याद्वारे तो तुम्हांला आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हांला आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे.
आपल्या परमेश्वर देवापासून परावृत होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, बाई, एखादे कुटुंब किंवा कूळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विषवल्लीसमान असतात.
“एखादा हे बोलणे ऐकूनही, ‘मी मला हवे तेच करणार. माझे काहीही वाकडे होणार नाही’ असे स्वत:चे समाधान करुन घेत असेल. पण त्याने हे लक्षात ठेवावे की त्याचा त्याला त्रास तर होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळते या न्यायाने निरपराध्यांनाही त्रास होईल.
(20-21) परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. इतर सर्व इस्राएलापासून अलग करुन परमेश्वर त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या ग्रंथातील सर्व शापांचा प्रत्यय त्या माणसाला स्वत:च्या बाबतीत येईल. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील कराराचा हा एक भाग आहे.
येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयीम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल.
त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला.
“काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.