इस्राएलच्या लोकांनो, संदेश ऐका! परमेश्वराने तुमच्याबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या मी मिसरमधून ज्या घराण्यांना (इस्राएलला) आणले, त्यांच्याबद्दल हा संदेश आहे.
“पृथ्वीच्या पाठीवर पुष्कळ घराणी आहेत पण मी फक्त तुमच्याच घराण्याला खास संबंध ठेवण्यासाठी निवडले पण तुम्ही माझ्याविरुध्द गेलात. म्हणून तुमच्या सर्व पापांसाठी मी तुम्हाला शिक्षा करीन.”
परमेश्वर म्हणतो, “जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला, तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील. पण तो मेंढीचा काही भागच वाचवू शकेल. तो कदाचित् मेंढीचे दोन पाय वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल. त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत. शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”